घटस्फोट

खिडकी तशी पूर्णपणे खुलीच होती..

त्यामुळे खिडकीतून वारा मनसोक्तपणे आत बाहेर करत होता..

दरवेळी खिडकी बंद असल्यामुळे आवाज करत, गोंगाट करत , मला आत यायचं आहे अस म्हणणारा वारा आज आनंदाने वाहत होता..

त्या वाऱ्याच्या इकडून तिकडून येरझाऱ्या मुळे की काय देवघरातील सदैव डोळ्यात तेल घालून जागी असणारी समईची वात ही कावरी बावरी झाली होती..

तो त्या दिव्याचा प्रकाश देवांच्या त्या लहान आकृत्यांना किती तेज देत होता..!!

अगदी ते सोन्याचे देव उठून दिसत होते..

पण अचानक वाऱ्याची शांतपणे झुळूक आली अन दिवा विझवून गेली...!!

स्वयंपाक घर ही तस अस्ताव्यस्त च होतं..

कट्यावर भांडी तशीच पडून होती, झुरळांची मस्त पार्टी सुरू होती..

पाण्याचा नळ तर तसा प्रत्येक आपला आसृला आवाज देत मोकळे करीत होता..

खूप दिवस झाले तो नळ बिघडला होता पण रोजच्या धावपळीच्या जीवनात कोणाला वेळ आहे दुसऱ्याच रडणं ऐकण्यासाठी..!!

त्यामुळे तो बिचारा नळ एकटाच आसृ गाळत होता...



बेडरूम ही तशी शांतच होती..

कपटाचे दार ही खुलेच होते, 

कपटामधील नेहमीच्या त्या साड्या अन पंजाबी ड्रेस आज कोठे दिसतच नव्हता..

दरवेळी आज मी बाहेर जाणार या शर्यती मध्ये एकमेकांशी भांडणाऱ्या साड्या आज एकत्रित बाहेर गेल्या..??!!

बेडरूम च्या कोपऱ्यात असणारे ते गुलाब कोमजले होते..

दरवेळी एकदम ऐटीत असणारे आणि समदं आसमंत त्याच्या सुगंधाने मोहित करणारे हे गुलाब आज मान खाली घालूनच शांत होते..!!



हॉल मध्ये तर ती बाटली अजूनही तशीच पडलेली होती..

तो काचेचा ग्लास भिंतीशी धडकल्यामुळे त्याने आपले सर्व अवयव इकडे तिकडे विखरून टाकले होते..

फरशी तर एकदम पांढरी असल्याने त्यावर ते पडलेलं रक्त उठून दिसत होतं, जस त्या शुभ्र कोजागिरी च्या रात्री चंद्र दिसतो तसा..

घात तर तसा त्या काचेच्या तुकड्यांनीच केला होता अन त्यामुळे च ते रक्त अन त्याचे डाग पसरले होते..!

भिंतीला ही कान असतात पण ते असं अचानक आणि पहिल्यांदाच होऊ घातलेलं कार्य भिंतींनी ऐकून स्वतःच्या कानावर हात ठेवून घेतले होते...

इतक्या सर्व शांततेत त्या भिंतीवरील घड्याळ मात्र आपले काम अगदी काटेकोर करीत होते..

१ तारखेचा सूर्य नवी ऊर्जा घेऊन आला होता मात्र त्या भिंतीवर खिळ्यांच्या आधारे लटकणारी दिनदर्शिका अजूनही मागचा दिवस च दाखवत होती..

रोज सकाळी सकाळी काहीतरी बडबडणारा रेडिओचा डब्ब्या आज मूग गिळून गप्प बसला होता..

टेबलावर तो असणारा स्वाक्षरीसहित घटस्फोटाचा पेपर  त्या अजूनही एक वर्ष न झालेल्या लग्नातील फोटोंसमोर खूपच भाव खात होता..

आयुष्यच्या शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करेन, साथ देईन असे म्हणणारे वचन आज त्या कागदामुळे पुर्णपणे कोठेतरी "जनांच्या नाही, पण मनाच्या लाजेने" दूर निघून गेले होते..!!


- सौरभ प्रमिला कासोटे 

- कोल्हापूर



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books