वचन

वचन

अष्टमीचा अर्धकोर चंद्र तसा अगदी दिमाखात "रजनीकांत" या नावाला शोभेल असा निरभ्र आकाशात स्थानापन्न होता..
रात्रीचे ८:३०-९ वाजायला आले होते..
देवघरातील दिवा लावून तास-दीड तास झाला होता..
त्याचा कॉल आलेलाच की वेळ होईल म्हणून पण इतका वेळ यामुळे ती काळजीने थोडी अस्वस्थ झाली होती..
गळ्यातील ते अगदी दुरुनही उठून दिसेल असे सोन्याच्या मंगळसूत्राबरोबर ची तिच्या हातांची झटपट सांगत होती की ती आता खूपच अस्वस्थ झालीये...!!
सारखे ते तिचे सुबकरदार पण थोडे पाणावलेले डोळे दाराकडे पाहत होते..
कानामध्ये जरी वजनदार अश्या design चे दागिने असले तरी कानांचे लक्ष बाहेर त्याची गाडी येते की नाही याकडेच होते..
स्वयंपाक करण्यासाठी ही मन होत नव्हते..
चपाती करण्यासाठी कणिक मळली होती पण तिला अजून चांगला आकार घेऊन तव्यावर अंग शेकण्याचा योग येत नव्हता..
कूकर च्या ३-४ शिट्या झाल्या असतील पण आज त्याला नजर चूकीमुळे जास्त काम लागणार याची शक्यता दिसत होती..!!!
नेमका फोन करावा तर तो गाडीवर असेल आणि रोडवरून येताना ट्रॅफिक खूप असते त्यामुळे तो नाही उचलणार याची खात्री तिला होती..त्यामुळे तिने तो विचार सोडून दिला..
थंडीचे दिवस होते त्यामुळे "ट्युबलाईट" भोवती वेगवेगळ्या किड्यांची एक प्रकारची सभाच जमली होती.. पण आडोश्याला लपून बसलेल्या पाली ला आज मेजवानी च होती..
तोवर तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली..!!
तिने आज सकाळी त्याचे राशिभविष्य वाचले होते आणि त्यामध्ये लिहिले होते,"वाहन सावकाश हाका"
अन पुन्हा हे तिच्या डोळ्यासमोर येऊ लागले..
हीचा धीर सुटत चाललेला होता, नेमकं काय करावे काहीच कळत नव्हते, खूप वर्षांपूर्वी तिचे वडीलही एका अपघातात स्वर्गवासी झाले होते. 
तिला पुन्हा ते राशिभविष्य दिसु लागले, वडिलांचा अपघात आठवू लागला..
तिला एकच मार्ग दिसला, सरळ देवघरात गेली आणि हात जोडून देवासमोर रडू लागली..
अचानक काय झाले काय माहिती, खिडकीतून मंद झुळूक आली अन दिव्याला शांत करून गेली..
ते पाहताच तिची मानसिकता अजूनच खचली..
ते जुने दिवस आठवू लागली, लग्नाच्या आधी दोघे लपुन छपून भेटायचे, गाडी वरून फिरायचे , कधी कधी कॉलेज चुकवून फिल्म ला जायचे हे सगळं चित्र तिच्या समोर येऊ लागलं..
जणूकाही चक्र च सुरू झालं, राशिभविष्य, वडील आणि जुने दिवस..
घरची परवानगी नसताना लग्न केल्यामुळे कोणाला फोन करणे पण जमत नव्हते, शेजारी तर कोण राहतो याचा पत्ताच नव्हता, कोल्हापूर ला असताना अगदी शेजारी म्हणजे आपलंच घर अस होतं पण पुण्यामध्ये आल्यापासून आपण आपलं घर इतकंच जग..
अन तोपर्यंत पार्किंग मध्ये कोणत्यातरी गाडीचा आवाज आला, ती तशीच धावत पळत बाहेर आली, पाहते तर काय, तो आला होता, हातात गुलाबाचे फुल घेऊन, ती सकाळीच म्हणाली होती मला पांढरे गुलाब हवे आहे..
अन ते पाहताच तिच्या डोळयातून आनंदासृ येऊ लागले..
तिने सरळ जाऊन त्याला मिठी मारली अन एक हुंदका आला..
त्याला समजले नेमके काय झाले आहे ते, तो फक्त इतकंच म्हणाला," तुला वचन दिलेलं विसरलीस का? अगदी तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबतच असेन...!!

- सौरभ कासोटे
(काल्पनिक आहे कथा)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books